Jammu Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील चासानाजवळ सोमवारी (4 सप्टेंबर) शोध मोहिमेदरम्यान भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या घटनेत आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला आहे, तर एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. सध्या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.
एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना सोमवारी मिळाली होती. माहितीच्या आधारे शोधमोहिम सुरू झाली, यावेळी चासाना येथील तुली भागात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनीहीह प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी मारला गेला आहे. तसेच, एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.
पूंछमध्ये चार दहशतवादी मारले गेलेयाआधी जुलै महिन्यात सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले होते की, पूंछमधील सिंध्रा भागात पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. कारवाईत मारले गेलेले दहशतवादी परदेशी(पाकिस्तानी) दहशतवादी होते.
घुसखोरीचा प्रयत्न फसलाऑगस्ट महिन्यातही लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालाकोट सेक्टरमधील चकमकीच्या ठिकाणी एक एके-47 रायफल, दोन मॅगझिन, 30 राउंड, दोन हँडग्रेनेड आणि पाकिस्तानी मूळची काही औषधे जप्त करण्यात आली.