श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये दोन मजुरांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने बुधवारी शोपियां जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ठार केलं आहे. हे सुरक्षा दलाचे मोठे यश मानले जात आहे. नागरिकांना लक्ष्य करण्याच्या दहशतवाद्यांच्या षडयंत्राला हा एक जोरदार प्रतिसाद मानला जातोय. आयजी काश्मीर विजय कुमार म्हणाले की, शोपियां चकमकीत ठार झालेल्या एका दहशतवाद्याची ओळख आदिल आह वानी म्हणून झाली आहे, जो जुलै 2020 पासून या भागात सक्रिय होता. तो पुलवामाच्या लिटर भागात एका बिगर काश्मिरी गरीब मजुराच्या हत्येत सहभागी होता. आतापर्यंत दोन आठवड्यांत 15 दहशतवादी ठार झाले आहेत.
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात दोन दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने परिसराचा घेराव घातला, यानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलानेही गोळीबार केला. शोपियांच्या द्रागड परिसरात झालेल्या या कारवाईत दोन दहशतवाद्यांना मारण्यात आलं.
घाटीत सुरक्षा कर्मचारी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सतत ऑपरेशन करत असतात. ऑक्टोबरमध्ये खोऱ्यात हिंदू आणि शिखांच्या हत्येच्या अनेक घटना घडल्या. बिगर काश्मीरींना लक्ष्य करून दहशतवादी सतत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सुरक्षा दलाकडूनही या दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात येतंय. याचाच भाग म्हणून आज दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. पुंछ सेक्टरमध्येही दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे.
पूंछमध्ये आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन
एका आठवड्यापासून पूंचमध्ये दहशतवाद्यांच्या गटाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये आतापर्यंत नऊ सैनिक शहीद झाले आहेत. सूत्रांनी सांगितले की, सोमवारी सकाळीही दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. दोन्ही पक्षांमधील पहिली चकमक 11 ऑक्टोबर रोजी पुंछ जिल्ह्यातील देहरा की गली भागात झाली, ज्यात जेसीओसह पाच लष्करी जवान शहीद झाले. गेल्या 17 वर्षांतील ही या प्रदेशातील सर्वात भीषण चकमक होती. ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यापासून सर्वात मोठे ऑपरेशन जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये केले जात आहे.