श्रीनगर: भाजपानंजम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे आता पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार अल्पमतात आलं आहे. जम्मू काश्मीर सरकारमधील भाजपाचे सर्व मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावर अमित शहांनी हा निर्णय घेतला. अमित शहांनी जम्मू काश्मीरमधील सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याआधी राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि मंत्र्यांशी संवाद साधला होता. अमित शहांनी घेतलेल्या या निर्णयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वाची होती. डोवाल यांनी आज सकाळीच अमित शहांची भेट घेतली होती. यानंतरच्या अवघ्या काही तासांमध्ये भाजपानं जम्मू काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अजित डोवाल यांनी अमित शहांना आज सकाळी जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली होती. राज्यातील दहशतवाद्यांना संपवण्याची संपूर्ण योजना यावेळी डोवाल यांनी शहांसमोर मांडली. रमजानच्या महिन्यात मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धची लष्करी कारवाई थांबवली होती. मात्र यानंतर आता लष्कराचे जवान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत, असं अजित डोवाल म्हणाले. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात बैठक झाली होती.
Jammu Kashmir: मोदींसोबतच 'या' व्यक्तीशी चर्चा झाली अन् अमित शहांनी PDPची साथ सोडली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2018 2:52 PM