श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये गुरुवारी (3 जानेवारी) झालेल्या हिमस्खलनात एक जवान शहीद झाला असून अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे. हे जवान पूंछ सेक्टरमधील सब्जियां सेक्टरमधील आर्मी पोस्टवर तैनात होते. मिळालेल्या माहितीनुसार, भारत-पाकिस्तान सीमेवर नियंत्रण रेषेजवळ पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हिमस्खलन झाले. या घटनेत लान्स नायक सपन मेहरा शहीद झाले आहेत. लान्स नायक सपन मेहरा हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील रहिवासी होते. जखमी जवानाचे नाव हरप्रीत सिंह असून ते मूळचे पंजाबमधील रहिवासी आहे. त्यांना जवळील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिमस्खलन होऊन दोन जवान बर्फाखाली अडकल्याची माहिती मिळताच अन्य जवानांकडून तातडीनं बचाव मोहीम राबवण्यात आली.
(काश्मीरमध्ये हिमस्खलनात पाच जणांचा मृत्यू)
जारी करण्यात आला होता इशाराअधिकाऱ्यांकडून बुधवारीच काश्मीर आणि लदाखमधील काही जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा वर्तवण्यात आला होता. काश्मीरमधील बांदीपुरा, बारामुल्ला, अनंतनाग, कुलगाम, बडगाम, कुपवाडा, गांदरबल, लेह आणि कारगिल जिल्ह्यांमध्ये हिमस्खलन होण्याची भीती असणाऱ्या परिसरात दोन जानेवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते 3 जानेवारीला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तवली होती.