पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानने सीमेला लागून असलेल्या भागात ड्रोनच्या मदतीने दारूगोळा टाकला. याच दरम्यान एका दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला आहे. हा दहशतवादी आयईडी आणि स्नायपर वापरण्यात एक्सपर्ट होता. क्वारी असं या दहशतवाद्याचं नाव आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्वारी लष्कर-ए-तोएबाचा टॉप रँकचा दहशतवादी असून तो अनेक गोष्टींमध्ये एक्सपर्ट होता. क्वारी गेल्या एक वर्षापासून राजौरी-पुंछमध्ये त्याच्या गटासह सक्रिय होता. तो डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मास्टरमाईंडही मानला जातो. त्याला परिसरात पुन्हा दहशतवाद पसरवण्यासाठी पाठवण्यात आले होते.
ड्रोनमधून टाकलेले नऊ ग्रेनेड आणि एका आयईडीसह शस्त्र आणि स्फोटकं जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही शस्त्रं आणि स्फोटकं एका बॉक्समध्ये भरलेली होती, जी एलओसीजवळ पालनवाला येथे लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बॉक्स पाहिल्यानंतर त्यांना संशय आला आणि बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले.
बॉक्समधून एक इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी), एक पिस्तूल, दोन मॅगझिन, 38 काडतुसे आणि नऊ ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत. तसेच जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात गुरुवारीही दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरूच होती. या चकमकीत आतापर्यंत दोन कॅप्टन दर्जाच्या अधिकार्यांसह चार जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत.