श्रीनगर : जम्मू-काश्मीर सरकारमधून भाजपा बाहेर पडल्यामुळे माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचं भवितव्य सध्या संकटात असल्याचं दिसत आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यापासून पक्षाच्या अनेक आमदार उघडपणे पक्षविरोधी सूर लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
(पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर; 14 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत)
या पार्श्वभूमीवर पीडीपीचे आमदार भाजपासोबत हातमिळवणी करुन राज्यात नवीन सरकार स्थापन करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पीडीपी आमदार अब्दुल माजिद पद्दार यांनी भाजपासोबत जाण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चेनं आणखी जोर धरला आहे. पद्दार शनिवारी म्हणाले की, पीडीपीचे आमदार भाजपाच्या मदतीनं राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याचा विचार करत आहेत. आमचे 28 पैकी 18 आमदार भाजपासोबत हात मिळवण्यास तयार आहेत. शिवाय, नवीन सरकार स्थापनेसाठी भाजपासोबत बोलणी सुरू असल्याचेही संकेत यावेळी त्यांनी दिलेत. पद्दार असंही म्हणाले की, ''जेव्हा माझे नेता स्वर्गीय मुफ्ती मोहम्मद सईद भाजपासोबत युती करू शकत होते, तर मग आम्ही भाजपासोबत सरकार स्थापन का करू शकत नाही?''.
मेहबूबा मुफ्ती यांनी पक्षात फुट पाडण्यावरुन भाजपाला इशारा दिला त्यावेळेस पद्दार यांनी हे विधान केले आहे. पीडीपी फोडण्याचा प्रयत्न कराल, तर परिणाम गंभीर होतील, असा इशारा काही दिवसांपूर्वी मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपाला दिला होता. 'जर दिल्लीतील सरकारनं 1987 प्रमाणे लोकांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा, लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल,' असं मुफ्ती म्हणाल्या. 'त्यावेळी एक सलाऊद्दीन आणि यासिन मलिक जन्माला आले होते. यावेळी परिस्थिती आणखी चिघळेल,' असंही त्यांनी म्हटले होते.
तर दुसरीकडे, पीडीपीचे 14 आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं नाराज नेते आबिद अन्सारी यांनीही म्हटले होते. तसंच मुफ्ती यांच्याकडून घराणेशाहीला प्रोत्साहन दिलं जात असल्याची उघड टीका बारामुल्लाचे आमदार जावेद हुसेन यांनी केली होती. गुलमर्गचे आमदार मोहम्मद वाणी यांनीही भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्यावरुन पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. पीडीपीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला असून पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.