श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी (28 नोव्हेंबर) रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शिवाय, दहशतवाद्यांकडील दारूगोळादेखील जप्त केला आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्यापपर्यंत ओळख स्पष्ट झालेली नाही.
दरम्यान, बुधवारी बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद जटला कंठस्नान घातले. जम्मू काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येत नवीद जटचा सहभाग होता.
पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय हद्दीत जास्तीत जास्त दहशतवाद्यांची घुसखोरी घडवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवाय, यावर्षी भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटमध्ये 241 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यानं पाकिस्तान बिथरला आहे. गेल्या वर्षी जवानांनी 213 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
(पत्रकार शुजात बुखारींच्या हत्या प्रकरणातील दहशतवाद्याचा जवानांनी केला खात्मा)
गोळ्या झाडून बुखारींची हत्या'रायझिंग काश्मीर'चे संपादक सुजात बुखारी यांची श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. बाईकवरुन आलेल्या तीन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. कार्यालयातून बाहेर पडत असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये बुखारी यांचा जागीच मृत्यू झाला. बुखारी यांच्या सरंक्षणासाठी असलेल्या दोन पोलिसांचाही गोळीबारात मृत्यू झाला. यापूर्वी, बुखारी यांच्यावर 2000 मध्ये हल्ला झाला होता. तेव्हापासून त्यांना संरक्षण देण्यात आले होते.