नवी दिल्ली : भाजपचे तत्कालीन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी ११ डिसेंबर १९९१ रोजी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत १५ हजार किमीची एकता यात्रा काढली होती. काश्मीरच्या लाल चौकात भारतीय तिरंगा फडकाविणे हे त्यांचे लक्ष्य होते. या यात्रेत असे दोन चेहरे होते त्यातील एका व्यक्तीकडे संपूर्ण यात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी होती. यातील एक चेहरा म्हणजे नरेंद्र दामोदारदास मोदी. तर, दुसरा चेहरा म्हणजे अमित शहा.भाजपसाठी कलम ३७० त्याच्या स्थापनेपासूनच प्रमुख मुद्दा राहिलेला आहे. याचे कारण असे की, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी ३७० कलम हटवू इच्छित होते. हे लक्ष्य पूर्ण करण्यापूर्वीच त्यांचा काश्मीरमध्ये मृत्यू झाला. पहिल्या कार्यकाळातच पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी यांनी ३७० हटविण्यासाठी अध्ययन सुरु केले. राज्यातील मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी- भाजप सरकार स्थापनेचा एक मोठा उद्देश हाही होता की, कलम ३७० बाबत जनता आणि स्थानिक राजकीय पक्षांमध्ये काय विचार आहे याचा अभ्यास केला जावा. त्यानंतर हे सरकार कोसळले आणि २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळीही भाजपमध्ये हे कलम हटविण्याबाबत विचार केला गेला. पण, त्यावेळी परिस्थिती अनुकूल नव्हती. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने असे ठरविले की, जर २०१९ मध्ये पुन्हा मोदी सरकार आले तर, पहिल्या एक- दीड वर्षात या मुद्यावर निर्णय घेतला जावा.
Jammu & Kashmir: एकता यात्रेच्या २७ वर्षांनंतर कलम ३७० हटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 2:45 AM