श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रविवारी (18 नोव्हेंबर) सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात रेबन परिसरात चकमक उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर, एसओजी आणि सीआरपीएफनं संयुक्त मोहीम राबवत या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
शोपियान परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना सूत्रांकडून मिळाली होती. यानंतर जवानांनी शोधमोहीम राबवली. शोधमोहिमेदरम्यान जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर घटनास्थळावरुन एक एके-47 आणि पिस्तूल जप्त करण्यात आली आहे. शिवाय, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळखही पटली आहे. अलबदर नवाज आणि आदिल अशी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.
( पंजाबमध्ये दिसला कुख्यात दहशतवादी झाकीर मुसा, हाय अलर्ट जारी )
दरम्यान, यापूर्वी शनिवारी दुपारी शोपियान जिल्ह्यातच दहशतवाद्यांनी तीन युवकांचं अपहरण केले होते. यातील एकाची हत्या करुन, अन्य दोघांना सोडून देण्यात आले होते.