जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्लांबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. सुरक्षेत कोणतीही कमतरता नाही. "सुरक्षा दल दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता हल्ल्यांचं प्रमाण कमी झालं आहे. सुरक्षा दल सतर्क आहेत आणि अशी परिस्थिती येईल जेव्हा जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया पूर्णपणे संपतील" असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
राजनाथ सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी मारले गेले. या भागात सुरक्षा दल सतत सक्रिय आहेत. २९ ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांनी अखनूरमध्ये एका उच्चस्तरीय चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकींवरून हे स्पष्ट होतं की, सुरक्षा दल दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करत आहेत आणि त्या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असताना राजनाथ सिंह यांनी यावर भाष्य केलं आहे. श्रीनगरच्या खानयार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानयार भागात सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवली होती, ज्यामध्ये गोळीबार झाला होता.
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सकाळपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या चकमक सुरू आहेत. अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर श्रीनगरच्या खानयारमध्ये सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले. ज्या घरात दहशतवादी लपले होते, तिथे मोठा स्फोट झाला आहे. यानंतर घराला भीषण आग लागली. परिसरात धुराचे लोट दिसत आहे.