राजस्थानातील एका बँक मॅनेजरची जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली. काश्मीर खोऱ्यात 1 मेपासून मुस्लिमेतर सरकारी कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांकडून झालेली ही तिसरी हत्या आहे. यानंतर, आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) संबंधित मॅनेजरच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. यासंदर्भात, एसबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत, विजय कुमार यांच्या कुटुंबाला एसबीआय आर्थिक मदतीशिवाय, इतर प्रकारेही मदद करेल, असे म्हटले आहे.
2019 मध्ये जॉईन केली होती बँक -SBI ने म्हटले आहे, की विजय कुमार हे SBI कडून स्पॉन्सर करण्यात येत असलेल्या Ellaqie Dehati Bank (EDB) मध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते. दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते केवळ 29 वर्षांचे होते आणि मार्च 2019 मध्येच ईडीबीमध्ये जॉईन झाले होते.
याच बरोबर, 'विजय कुमार हे देशातील विविधा भागांतील कर्मचाऱ्यांपैकी एक होते. जे काश्मीर आणि इतरही काही खडतर भागांत, नागरिकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी काम करतात. एसबीआय ईडीबीला स्पॉन्सर करते, यामुळे बँक आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि कल्यानासाठी वचनबद्ध आहे. यात काश्मिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामुळे, ईडीबीकडून त्यांच्या कुटुंबाला तत्काळ वित्तीय आणि इतर प्रकारची मदतही केली जाईल,' असे एसबीआयने म्हटले आहे.
1 मे पासून आतापर्यंत 8 'टार्गेट किलिंग' -जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव नाही. जम्मू-काश्मीरमध्ये 1 मे ते 2 जून या कालावधीत 8 जणांना टार्गेट करण्यात आले आहे. खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगवरून विरोधक मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. कुलगाममध्ये एका काश्मिरी पंडित शिक्षिकेच्या हत्येनंतर दोन दिवसांनी दहशतवाद्यांनी विजय कुमारची हत्या केली. यापूर्वी 31 मे रोजी जम्मूमध्ये रजनी बाला (36) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. कुलगामच्या गोपालपुरा जिल्ह्यातील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या.
मे महिन्यात दहशतवाद्यांनी 7 टार्गेट किलिंग केल्या. सर्वात आधी 12 मे रोजी दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची हत्या केली. यानंतर 25 मे रोजी कलाकार अमरीन भट्ट यांचीही हत्या करण्यात आली. याशिवाय तीन ऑफ ड्युटी पोलीसांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.