Jammu Kashmir Terror Attack : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या अध्यक्षतेखाली आज(दि.16) जम्मू-काश्मीरबाबत उच्चस्तरीय सुरक्षा बैठक पार पडली. या बैठकीत अमरनाथ यात्रेची सुरक्षा आणि अलीकडील दहशतवादी हल्ल्यांवर चर्चा झाली. या बैठकीत शाह यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद आणि याला समर्थन देणाऱ्यांना ठेचून काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, यापुढे कोणत्याही किंमतीवर दहशतवाढ वाढणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
या बैठकीत अमित शाह यांनी अमरनाथ यात्रेसाठी संपूर्ण सुरक्षा कवच, यात्रा मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था, महामार्गांवर अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करणे, सर्व तीर्थक्षेत्रांवर दक्षता वाढविणे आणि जम्मू-काश्मीरमधील पर्यटन स्थळांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याशिवाय, गृहमंत्र्यांनी अलीकडील दहशतवादी हल्ले आणि जम्मू प्रदेशातील सध्याची सुरक्षा परिस्थिती, यावर सविस्तर अहवाल मागवला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गृहमंत्र्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना जम्मूमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गुप्त माहिती गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच ज्या मार्गांवरुन परदेशी दहशतवादी देशात घुसतात, ते मार्ग किंवा पॉइंट बंद करण्यावरही भर देण्यात यावा, असेही सांगितले आहे. बैठकीत जम्मू-काश्मीरमधील सर्व पर्यटन स्थळांच्या सुरक्षा योजनांवरही चर्चा करण्यात आली आणि दहशतवाद्यांचे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना सुधारण्यावर भर देण्यात आला.
बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होतेदिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, आयबीचे संचालक तपन डेका, सीआरपीएफचे डीजी अनिश दयाल सिंह, जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा, मुख्य सचिव अटल दुल्लू, डीजीपी आरआर स्वेन, एडीजीपी विजय कुमार, जम्मू-काश्मीरचे वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि गुप्तचर अधिकारी सहभागी झाले होते.