Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीनगरमधील अत्यंत गजबजलेल्या लाल चौकात दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात किमान 15 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लाल चौकात घबराट पसरली असून, परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाने घेराबंदी केली आहे.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवाद्यांनी लाल चौकातील ऑल इंडिया रेडिओ स्टेशनबाहेर सीआरपीएफच्या बंकरवर हा ग्रेनेड हल्ला केला आहे. माहिती मिळताच, जम्मू-काश्मीर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून, या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, स्फोटात जखमी झालेल्या सर्व लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलाने स्फोट झालेला संपूर्ण परिसर सील केला आहे.
दहशतवाद्यांसोबत चकमकदरम्यान, श्रीनगरच्या खन्यारमध्ये काल म्हणजेच शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर कमांडर उस्मानला ठार केले होते. उस्मान हा लष्कर कमांडर सज्जाद गुलचा उजवा हात मानला जातो. उस्मानचे सांकेतिक नाव ‘छोटा वलीद’ असे होते.
तो काश्मीरमधील लष्कर-ए-तैयबाचा सर्वात वरिष्ठ कमांडर मानला जात होता. उस्मानच्या मृतदेहासोबतच मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये गेल्या 48 तासांत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चकमकी झाल्या. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकींमध्ये श्रीनगर, बांदीपोरा आणि अनंतनागचा समावेश आहे.
हल्ला अस्वस्थ करणारा-मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा निषेध केला असून, हा हल्ला अत्यंत संतापजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यातील काही भागात हल्ले आणि चकमकीच्या बातम्या येत आहेत. श्रीनगरच्या रविवारच्या बाजारात निष्पाप दुकानदारांवर ग्रेनेड हल्ला झाल्याची आजची बातमी अतिशय अस्वस्थ करणारी आहे. निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्याचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. सुरक्षा यंत्रणांनी हल्ल्याची ही लाट लवकरात लवकर थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत."
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सातत्याने कारवाया सुरू आहेत. दहशतवादी दररोज येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि नेहमीच दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचत असतात. याला तोंड देण्यासाठी सुरक्षा दल सदैव तत्पर असतात.
सुरक्षा दलाचे 4 जवानही जखमी झाले आहेतअधिकाऱ्याने सांगितले की, उस्मान एक दशकापासून खोऱ्यात सक्रिय होता आणि अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याची हत्या हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांसाठी मोठा धक्का आहे. उस्मान हा येथील पाकिस्तानी लष्कराचा सर्वात वरिष्ठ कमांडर असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीनगर चकमकीत सुरक्षा दलाचे चार जवानही जखमी झाले आहेत.