श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी (29 मार्च) संध्याकाळी दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी हल्ले केले. यातील एका प्रकरणात दहशतवाद्यांनी घरात घुसून एका पोलीस अधिका-याची घरात घुसून निर्घृण हत्या केली आहे. या हल्ल्यांमध्ये दोन जण जखमीदेखील झाले आहेत. हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिका-याच्या पत्नीसहीत एका स्थानिकाचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिसरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पहिला दहशतवादी हल्ला शोपियान जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी पहिला हल्ला केला. लष्कराच्या तुकडीवरदेखील यावेळी हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. ज्या परिसरात दहशतवादी लपून बसले होते, त्याला घेराव घालत जवानांनी शोध मोहीम राबवली.
दुसरा दहशतवादी हल्ला
यानंतर दुसरा दहशतवादी हल्ला अनंतनाग जिल्ह्यात करण्यात आला. येथील बिजबेहडा परिसरात एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. मुश्ताक अहमद शेख असं हल्ल्यात मृत पावलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.
तिसरा दहशतवादी हल्ला
यानंतर, कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी तिसरा हल्ला केला. दहशतवाद्यांनी सर्वसामान्य जनतेला निशाणा करत त्यांच्या गोळीबार केला. यामध्ये एका स्थानिकाच्या पायाला गोळी लागल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली आहे.