नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी दहशतवादी व लष्कराच्या जवानांमध्ये झालेल्या चकमकीत जवान निलेश सिंह यांना वीरमरण आलं. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी त्यांच्या नगरी गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण गाव निलेश सिंह यांच्या जाण्याने दुःखात आहे. पण निलेश यांचा 10 वर्षाचा मुलगा अंशने निर्धार केला आहे. वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं अंशने ठरवलं आहे .'मोठा होऊन मी सैन्यात जाणार वडिलांच्या मृत्यूचा बदला घेणार. सैन्यात गेल्यावर शंभर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करणार, असा निर्धार अंशने केला आहे.
नगरी गावात राहणारे शहीद जवान निलेश सिंह हे जम्मू-काश्मीरच्या शोपियामध्ये तैनात होते. रविवारी झालेल्या चकमकीत निलेश यांना वीरमरण आलं. निलेश यांच्या जाण्याने त्यांचे वडील रामप्रसाद, आई उषा तसंच पत्नी व मुलाची परिस्थिती दुःखाने अतिशय वाईट झाली आहे. निलेश यांचा मुलगा अंश जरी वडील जाण्याच्या दुःखात असला तरी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा राग त्याच्या डोळ्यात आहे. पत्रकारांसोबत बोलताना मी दहशतवाद्यांना अजिबात घाबरणार नाही, वडिलांच्या मारेक-यांना मी सोडणार नाही, प्रत्येकाचा बदला घेईन असं तो म्हणाला. वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अंशने केलेला निर्धार पाहून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच सुखद धक्का बसला. इतकंच नाही तर तेथे उपस्थित असलेले लष्कराचे अधिकारीही आश्चर्यचकीत झाले.
दरम्यान, निलेश यांच्या वडिलांनी त्यांचा दुसरा मुलगा मुकेशसाठी लष्करात नोकरीची मागणी केली आहे. जानेवारी महिन्यात निलेश यांची पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये झाली होती.