श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. रविवारी (30 सप्टेंबर) सकाळी हा हल्ला करण्यात आला. हल्ला करुन दहशतवादी फरार झाले आहेत. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत, शोधमोहीम सुरू केली आहे. दहशतवादी परिसरातच लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जवान परिसरातील प्रत्येक घराची कसून तपासणी करत आहे.
('Surgical Strike' मधील शिलेदार शहीद, तीन दहशतवाद्यांना संपवून वीर जवान धारातिर्थी)
दरम्यान, एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान भारताकडे मैत्रीचा हात पुढे करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 250 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर 27 लॉन्च पॅड उभारण्यात आले आहेत. यामधून दहशतवादी भारतात घुसू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे, यातील आठ कॅम्प गेल्या महिन्याभरात उभारले गेले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा आशीर्वाद असलेल्या दहशतवाद्यांनी लिपा भागात कॅम्पची उभारणी केली आहे. या भागातील कॅम्प भारतीय सैन्यानं दोन वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक करुन उद्ध्वस्त केला होता. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईवेळी भिंबर गली परिसरातील लॉन्चिंग पॅड्सदेखील उद्ध्वस्त केले होते. मात्र सध्या तरी या भागात दहशतवाद्यांनी लॉन्चिंग पॅड्स उभारलेले नाहीत. भारतीय सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन दिवसांनी दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. इमरान खान पंतप्रधान झाल्यापासून जवळपास 250 दहशतवादी लॉन्चिंग पॅड्सवर डेरेदाखल झाले आहेत. यातील बहुतांश दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे आहेत. गेल्या महिन्याभरात लिपा, चकोठी, बरारकोट, शार्डी, जुरा भागात दहशतवाद्यांनी लॉन्चिंग पॅड्स उभारले आहेत. याशिवाय चनानिया, मंदौकली आणि नौकोटमध्येही लष्कर-ए-तोयबानं कॅम्प उभारले आहेत. याठिकाणी 30 दहशतवादी आहेत.