ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - उत्तर काश्मीरमधील कुपवारा जिल्ह्यात नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा-या तीन दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं आहे. बुधवारी सकाळी दहशवाद्यांनी नियंत्रण रेषा पार करुन घुसखोरीचा प्रयत्न केला. लष्कराने दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे.
लष्कर अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, नौगाम सेक्टरमध्ये पाठवण्यात आलेल्या जवानांना नियंत्रण रेषेवर सकाळी काही दहशतवादी हालचाल करत असून घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात आलं. यानंतर जवानांनी तात्काळ कारवाई करत दहशतवाद्यांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर दहशतवाद्यांनीही हल्ला करण्यास सुरुवात केली.
#UPDATE One more terrorist gunned down by security forces in J&K"s Naugam sector, taking the total to 3. Weapons recovered, ops continue.— ANI (@ANI_news) June 8, 2017
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बराच वेळ चकमक सुरु होती. या चकमकीत तीन दहशतवादी ठार करण्यात आले असून एक जवान शहीद झाला आहे. ऑपरेशन अद्यापही सुरु असल्याची माहिती अधिका-याने दिली आहे.
चकमकीची माहिती मिळताच अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली जेणेकरुन दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यात यश मिळू नये अशी माहिती लष्कर अधिका-याने दिली आहे. गेल्या 48 तासात दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केलेली ही दुसरी घटना आहे.
काल माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. जम्मू काश्मीरमधील कुपवारा येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं.