श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पोलिसांवर भ्याड हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी जैनपोरामध्ये एका पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (11 डिसेंबर) दुपारी दहशतवाद्यांनी पोलीस चौकीवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली. यामध्ये तीन पोलीस कर्मचारी शहीद झाले तर, एका जखमी पोलीस कर्मचाऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस चौकीवर हल्ला केल्यानंतर दहशतवादी फरार झाले. सध्या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
(Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट! 72 तासांत 16 दहशतवाद्यांचा खात्मा)
दरम्यान, श्रीनगरजवळील मुजगुंड भागात शनिवार दहशतवाद्यांसोबत मोठी चकमक झाली. यामध्ये भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. तर या चकमकीवेळी पाच जवान जखमी झाले होते.
अधिकाऱ्यांना सांगितले की, शनिवारी संध्याकाळी 4.30 वाजता लाल चौकापासून 15 किमी दूरवरील मुजगुंड मलूरा भागात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर जवानांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने परिसराला घेराव घातला. शोधमोहीमेदरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. खबरदारी म्हणून परिसरातील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती.