श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अनंतनाग जिल्ह्यातील सेकिपोरा परिसरात ही चकमक सुरू आहे. चकमकीदरम्यान सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश मिळाले आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
(Jammu Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा)
परिसरात सध्या शोध मोहीम सुरू आहे. यादरम्यान, अनंतनाग जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यापूर्वी सोमवारीदेखील जम्मू काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात चकमकीदरम्यान जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
(दहशतवाद्यांचं सुरक्षा दलांना खुलं आव्हान; श्रीनगरच्या लालचौकात काढला सेल्फी)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना थेट आव्हान दिलं. हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी थेट श्रीनगरच्या मध्यभागात असलेल्या लालचौक परिसरात बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये जवळपास 10 दहशतवादी उपस्थित होते. बैठकीनंतर हिज्बुलचा कमांडर उमर माजिद उर्फ हनजल्लानं या भागातील सेल्फीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.