लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिज्बुलच्या एका टॉप कमांडरचा समावेश आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कारवाईदरम्यान अनंतनाग जिल्ह्यातील मोबाइल-इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती.
दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे मंगळवारी लष्कराच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले होते. तसेच सुरक्षा दलांवर गोळीबारही करण्यात आला. मात्र सुरक्षा दलांनीही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. तत्पूर्वी चार दिवसांपूर्वी हंदवाडामध्ये चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीनंतर जवानांनी त्यांना अटक केली होती. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी हे नवीन दहशतवादी संघटना अल बद्रचे दहशतवादी होते.