श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील रामबाग भागात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या भागात अजूनही काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळते. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलाने अद्याप संपूर्ण परिसर घेरला असून या भागात शोध मोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाला श्रीनगरच्या रामबाग भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घालण्यास सुरूवात केली असता येथील घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रतिउत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
दरम्यान, दहशतवादी काही तास गोळीबार करत होते. या गोळीबाराच्या आवाजावरून घरात दोनहून अधिक दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते, हे अद्याप कळू शकले नाही. तरीही या भागात अजूनही काही दहशतवादी लपून बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने परिसर घेरला असून शोध मोहीम राबविली जात आहे. याआधी शनिवारी (10 ऑक्टोबर) जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चिंगम परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.
गेल्या आठवड्यात एलओसीवर पाकचा गोळीबारपाकिस्तानी सैनिकांनी गेल्या आठवड्यात कुपवाडा जिल्ह्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारापाठोपाठ तोफगोळ्यांनी केलेल्या माऱ्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला. यात दोन जवान शहीद झाले होते, तर अन्य चार जण जखमी झाले होते. या जखमी जवानांना उपचारासाठी हलविण्यात आले होते.