श्रीनगर - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून काश्मीर खोऱ्यातील मुस्लिमांना भडकविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तान काश्मीर मुद्द्यावरून जगाला धमकी देत आहे. काश्मीरातील मुस्लिमांवर होणारा अन्याय जग उघड्या डोळ्याने बघत आहे. याचठिकाणी जर मुस्लीम नसते तर जग काश्मिरींच्या मागे उभं राहिलं असतं अशी विधान करून पाकिस्तान भारताला पोकळ धमक्या देत आहे.
मात्र पाकिस्तानच्या या दाव्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी जम्मू काश्मीरातील तब्बल 575 तरूण भारतीय लष्करात भरती झालेले आहेत. ज्या मुस्लिमांवर अन्याय होतो असे खोटे दावे करणारे पाकिस्तानला खोऱ्यातील तरूणांनीच उत्तर दिलं आहे. देशाच्या रक्षणासाठी सज्ज झालेले हे तरूण भविष्यात पाकिस्तानचा कर्दनकाळ बनल्याशिवाय राहणार नाहीत. कलम 370 हटविल्यानंतर हळूहळू जम्मू काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अनेक गोष्टींवरील निर्बंध हटविले जात असल्याने जनजीवन सर्वसामान्य होत आहे. अशातच देशाची सेवा करण्यासाठी जम्मू काश्मीरातील तरूण भारतीय लष्करात सहभागी होत आहे.
श्रीनगरमध्ये शुक्रवारी रेजिमेंट सेंटर पासिंग परेड आयोजित करण्यात आली होती. यात 575 तरूण सहभागी झाले होते. भारतीय लष्करात 575 तरूण समाविष्ट झाले आहेत. यातील एक श्रीनगरमध्ये राहणारा वसीम अहमद मीर. वसीम यांचे वडील भारतीय लष्करात होते. त्यांच्या गणवेशाला पाहूनच वसीम प्रेरित झाल्याने त्याने भारतीय लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना वसीम अहमद मीर म्हणाला की, मी आज खूप आनंदी आहे. माझ्या घरच्यांना माझ्यावर गर्व आहे. आम्हाला लष्करात शारिरीक आणि मानसिक भरपूर काही शिकायला मिळालं अशा शब्दात वसीम मीरने भावना व्यक्त केल्या.
काश्मीरमध्ये मुस्लिमांवर अन्याय होत असताना जगातील सर्व देश मौन बाळगतात. सर्व जगाला माहित आहे की, काश्मीरात काय परिस्थिती आहे. काश्मीरात मुस्लीम नसते तर सर्व जग त्यांच्यामागे उभं राहिलं असतं. काश्मीर कठीण संकटातून जात आहे असा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शुक्रवारी केला होता. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील तरूणांनी लष्करात भरती होऊन पाकला चांगलीच चपराक दिली आहे.