श्रीनगर : पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच, येथील पोलिसांनी मोठ्या संख्येने अटकसत्र सुरू केले आहे. यात जवळपास 150 फुटीरतावादी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये तनावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. यासिनच्या अटकेनंतर जम्मू-काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानी समर्थक पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना विशेषाधिकार प्रदान करणाऱ्या कलम 35 ए सारख्या संवेदनशील मुद्द्यावर सोमवारपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काश्मीर खोऱ्यात छापे टाकून जमात-ए- इस्लामीशी संबंधित सुमारे 150 जणांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. यात जमात-ए- इस्लामीचा प्रमुख डॉ. अब्दुल हमीद फैयाज आणि प्रवक्ते ॲड. जहिद अली या दोघांसह डझनभर फुटीरतावादी नेत्यांना अटक केली आहे.
दुसरीकडे, केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये 45 सीआरपीएफ, 35 बीएसएफ, 10 एसएसबी आणि 10 आयटीबीपी या अर्धसैनिक दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे.