श्रीनगर - कलम 370 ला मंजुरी मिळताच काश्मीर खोऱ्यात मोठ्या कारवाईला सुरुवात झाली आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. तसेच महेबूबा मुफ्ती यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली आहे, महेबूबा मुफ्ती यांना शासकीय विश्रामगृहात हलवण्यात आले आहे. कलम 370 रद्द करण्याबाबत आणि काश्मीरच्या विभाजनाला राज्यसभेची मंजुरी मिळाल्यानंतर कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
गेली अनेक दशकं चर्चेचा, वादाचा विषय ठरलेलं, जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं राज्यघटनेतील 'कलम 370' रद्द करण्याची, त्यातील काही वादग्रस्त तरतुदी वगळण्याची ऐतिहासिक शिफारस केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज 370 कलमासंदर्भतील दुरुस्ती विधेयक राज्यसभेत सादर केले. त्यानंतर जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले.
तत्पूर्वी अमित शहा यांनी राज्यसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. जम्मू-काश्मीरचेकलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर भाजपा व्होटबँकेचे, जातीयवादाचे राजकारण करत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र, काश्मीरमध्ये केवळ मुस्लिमच राहतात का? तुम्हाला काय म्हणायचे आहे. काश्मीरमध्ये मुस्लिम, हिंदू, शीख, जैन, बुद्धिस्टही राहतात. जर 370 कलम चांगले असेल तर ते सर्वांसाठी चांगले आणि जर वाईट असेल तर सर्वांसाठी वाईटच असणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले.