जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी बसवर अंदाधुंद गोळीबार केला. बसचालकाला गोळी लागली आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे बस दरीत पडली. या हल्ल्यात ३० हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात्रेकरूंनी भरलेली बस शिवखोडीहून कटरा येथे जात असताना दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.
दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले बलरामपूर, यूपीचे रहिवासी संतोष कुमार वर्मा यांनी सांगितलं की, शिवखोडीला भेट दिल्यानंतर आम्ही कटराकडे जात होतो. बस वरून खाली येत असताना एका दहशतवाद्याने रस्त्याच्या मधोमध गोळीबार सुरू केला. चालकाला गोळी लागल्याने बस दरीत पडली. दहशतवाद्यांनी सुमारे २० मिनिटे गोळीबार केला. गोळीबार थांबल्यानंतर पोलीस आले आणि स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. दहशतवादी गोळीबार करत होते. ५-६ वेळा गोळीबार केल्यानंतर ते थांबायचे आणि पाच मिनिटांनी पुन्हा गोळीबार सुरू करायचे.
यूपीच्या गोंडा येथील रहिवासी नीलम गुप्ता यांनी सांगितलं की, आम्ही शिवखोडीला भेट दिल्यानंतर येत होतो. दहशतवाद्यांनी गोळीबार केला, गोळी बसचालकाला लागली आणि बसवरचं नियंत्रण सुटलं आणि ती दरीत पडली. बस दरीत कोसळली तेव्हा आम्हाला दहशतवादी दिसत नव्हते. बसमध्ये लहान मुलांसह ४० लोक होते. आमच्या हातापायांना लागलं आहे.
नीलम गुप्ता यांचा मुलगा पल्लव याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही बसमध्ये होतो आणि कोणी गोळीबार केला हे आम्हाला माहीत नाही. आवाज कमी झाल्यावर आम्ही सगळे बसमधून खाली उतरलो. काही वेळ गोळीबार झाला नाहीत, आम्ही दरीत पडलो. आमचे डोकं सीटखाली अडकलं, माझ्या बाबांनी मला बाहेर काढलं.
एका यात्रेकरूने सांगितलं की तेथे ६-७ दहशतवादी होते, त्यांचे चेहरे मास्कने झाकलेले होते. सुरुवातीला त्यांनी रस्त्यावर बसला घेरलं आणि गोळीबार केला. बस दरीत पडल्यावर ते बसच्या दिशेने खाली आले आणि सर्व लोक मारले गेले याची खात्री करण्यासाठी गोळीबार करत राहिले. आम्ही गप्प बसलो होतो. शिवखोडी येथून वैष्णोदेवीला संध्याकाळी ६ वाजता बस गेल्यानंतर ३० मिनिटांनी ही घटना घडली.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, यात्रेकरूंवरील क्रूर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडलं जाणार नाही. रविवारी दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर शाह म्हणाले की, त्यांनी जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी आरआर स्वेन यांच्याशी चर्चा केली आणि दहशतवादी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतला.