भारतीय रेल्वे आणि जम्मू आणि काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर होत असलेला रेल्वे पूल भारतीय अभियांत्रिकीचे आश्चर्य म्हणता येईल. हा जगातील सगळ्यात उंच रेल्वे पूल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल. या पुलाचे काम कोकण रेल्वे निगम लिमिटेडकडे आहे. त्याचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘चिनाबवरील पुलावर एक बंजी जंपिंग प्लॅटफॉर्म तयार केला जाईल. या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या बक्कल आणि कौडी गावांसाठी रेल्वेस्थानक असेल. या पुलाच्या जवळपासच्या हिरव्यागार वातावरणात जवळपास चार किलोमीटर दूर एका जागेची निवड केली गेली असून, तेथे आधुनिक सुविधांचा रिसोर्ट बनवला जाईल. रात्री रोषणाईत पुलाच्या खाली नौकाविहाराचा आनंद रोमहर्षक असेल.’ जवळपास १७ मीटर रुंदीच्या या पुलावर फूटपाथ आणि सायकलमार्गही असेल. २००४ मध्ये या पुलाचे काम सुरू झाले. ते पुढील वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. पूल पूर्ण होण्याची तारीख मार्च २०१९ आहे.या १२ वर्षांत अनेक अडचणी आल्या. विदेशी सल्लागारांच्या मार्गदर्शनानुसार कामांनी आता वेग घेतला आहे. जम्मूकडील वाले नदीच्या दक्षिणेकडे जवळपास ३५० मीटरचा उतार पक्का करण्याबरोबरच पुलाच्या अर्धचंद्राकार कमानीचा पाया घातला गेला. फुटबॉलच्या मैदानाच्या अर्ध्या क्षेत्रफळाएवढा असा हा पाया श्रीनगरकडील उत्तरेकडे घातला जाईल. हा पूल भूकंपाचे आठ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्केही अगदी सहज सहन करू शकतो. या पुलाची क्षमता ताशी २६६ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनाही सोसायची आहे.दहशतवादी कारवाया, तोडफोडीची शक्यता विचारात घेऊन या पुलाला इतके सुरक्षित बनविण्यात आले आहे की, त्याची हानी ४० टीएनटी क्षमतेचा स्फोट झाला तरी होणार नाही. वाऱ्याचा वेग तासाला ९० पेक्षा जास्त किलोमीटर असेल, तर सिग्नल लाल बनतील व रेल्वेला थांबवले जाईल. पुलामध्ये ६३ मि.मी. जाड विशेष ब्लास्ट प्रूफ पोलाद वापरले जात आहे. स्फोटांनाही सहन करू शकतील अशी पुलाच्या खांबांची रचना आहे. त्यांच्यावर जो रंग (पेंट) लावला जाईल तो किमान १५ वर्षे टिकेल.भूगर्भीय हालचालींचा विचार करता हा भाग झोन चारमध्ये मोडतो; परंतु पुलाची निर्मिती सर्वाधिक हालचाल असलेल्या झोन पाचच्या गरजा समोर ठेवून केली जात असल्याचे प्रकल्पाचे संचालक राजेंद्र कुमार यांनी सांगितले. चिनाब नदी तळापासून पुलाची उंची ३५९ मीटर असेल. जगप्रसिद्ध आयफेल टॉवरची उंची ३२४ मीटर आहे. या पुलाच्या निर्मितीचा खर्च १,२०० कोटी रुपये झाला आहे. सुरुवातीला ती गुंतवणूक ५०० कोटी रुपये होती. जगात दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात उंच पूल चीनमध्ये बेईएॅन नदीवर शुईबाई नदीवर आहे.
जम्मूत साकारतोय जगातील उंच रेल्वे पूल
By admin | Published: May 12, 2017 12:48 AM