श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा भागात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (29 डिसेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. राजपोरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच जम्मूमध्ये सकाळी बस स्थानकाजवळ कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोटही करण्यात आला आहे. याआधी पुलवामामधील अवंतीपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी चकमक सुरू झाली होती. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.