नवी दिल्ली: एरवी राजकीय नेत्यांनी भाषणं केली की विरोधक त्यामधील खोटी आश्वासनं शोधण्याच्या कामाला लागतात. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाल्यानंतर लोकांना त्यामध्ये 'खरेपणा' शोधाव लागतो, अशा जळजळीत शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी भाजपाला लक्ष्य केले. ते रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींच्या भाषणबाजीवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदी एकापाठोपाठ भाषणं करतात, जिथे जातील तिथे बोलतात. मात्र, यामध्ये भ्रष्टाचार, नोटाबंदीचे अपयश, शेतकऱ्यांच्या समस्या या एकाचाही उल्लेख नसतो. त्यांच्या परदेशांमधील भाषणांमध्ये ते मी देशाचा चौकीदार असून भ्रष्टाचाराविरोधात लढत असल्याचा दावा करतात. परंतु, भाजपा नेत्यांचे गैरव्यवहार आणि नीरव मोदी या मुद्द्यांवर मात्र ते सोयीस्कररित्या मौन बाळगतात, असा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला. यावेळी राहुल गांधी यांनी न्यायपालिकेतील असंतोष, राफेल विमान खरेदी, बेरोजगारी आणि देशभरातील बलात्काराच्या घटना या मुद्द्यांवरही भाष्य केले. देशात सध्या मुली सुरक्षित नाहीत. भाजपाकडून आरोपींना संरक्षण दिले जाते, असा आरोप त्यांनी केला. एकीकडे भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडे पैसे नसल्याचे बोलले जाते. मात्र, त्याचवेळी मोदी आपल्या उद्योगपती मित्रांना पैसे पुरवतात. काँग्रेस सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीचे कंत्राट हिंदुस्थान एनरॉटिक्स लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते. त्यावेळी हे एक विमान भारताला 700 कोटींना मिळणार होते. मात्र, मोदींनी सत्तेत आल्यानंतर हे सर्व व्यवहार रद्द केले. त्यांनी हिंदुस्थान एनरॉटिक्सकडून विमान निर्मितीचे कंत्राटही काढून घेतले. त्यामुळे राफेल विमानांची किंमत 1500 कोटींवर गेली आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच देशाच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयातील लोकांना प्रथमच न्यायासाठी जनतेसमोर यावे लागले, याकडेही राहुल यांनी लोकांचे लक्ष वेधले. तत्पूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व सोनिया गांधी यांनीदेखील जनआक्रोश रॅलीच्या व्यासपीठावरून लोकांशी संवाद साधला. यावेळी मनमोहन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीचा दाखला देत देशात अजूनही इंधनाचे दर चढे का, असा सवाल उपस्थित केला. तर सोनिया गांधी यांनीही मोदींच्या 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' या घोषणेचा समाचार घेतला. उलट मोदींच्या काळात भ्रष्टाचाराची पाळमुळं आणखी घट्ट झाली. मोदींच्या सर्व आश्वासनांमधील पोकळपणा सिद्ध झाला, असे सोनिया गांधी यांनी सांगितले.
मोदींच्या भाषणात लोकांना 'खरेपणा' शोधावा लागतो; राहुल गांधींची जळजळीत टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 12:56 PM