पाटणा : भाजप आज जनता परिवाराच्या विलीनीकरणाची टर उडवत आहे. पण हाच जनता परिवार उद्या भाजपचा विध्वंस करणारा ठरेल, असे भाकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी वर्तवले.नवी दिल्लीवरून परतल्यानंतर पाटणा विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. जनता परिवाराच्या रूपात एका नव्या शक्तीच्या उदयामुळे भाजप नेत्यांना भयाने पछाडले आहे. ते जनता परिवाराची टर उडवत नसून आपल्या भयाचे दर्शन घडवत आहेत. या विलीनीकरणात अनेक अडचणी असल्याचे भाजप ओरडून सांगत आहे. प्रत्यक्षात अंतर्मनातून ते घाबरले आहेत, असे नितीश म्हणाले.सहा पक्षांच्या विलीनीकरणामुळे बिहार सरकारच्या कामकाजावर विपरीत परिणाम होईल, ही शक्यताही नितीश यांनी यावेळी धुडकावून लावली. बिहार सरकार पूर्वीसारखे काम करीत राहील. सुशासन, विकास व जनतेची सेवा यासाठी बिहार सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.मूळच्या जनता दलातून बाहेर पडून गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ स्वतंत्रपणे आणि प्रसंगी परस्परांविरुद्ध लढलेल्या ‘जनता परिवारा’च्या सहा पक्षांचे बुधवारी मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली एकत्रीकरण झाले होते. यात समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, संयुक्त जनता दल, भारतीय राष्ट्रीय लोकदल, जनता दल (धर्मनिरपेक्ष) व समाजवादी जनता दल या पक्षांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
‘भाजपसाठी विध्वंसक ठरणार जनता परिवार’
By admin | Published: April 16, 2015 11:53 PM