पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जनता परिवाराचे विलीनीकरण वेळेवरच होणार असून, सहाही घटक पक्ष नव्या पक्षाच्या एकाच ध्वजाखाली एकत्र येत एकाच चिन्हावर निवडणूक लढतील, असे जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. त्यागी यांनी बुधवारी स्पष्ट केले.‘समाजवादी जनता दल’ आणि ‘समाजवादी जनता पार्टी’ या दोन नावांवर विचार केला जात असून, त्यापैकी एका नावाची निवड होईल. विलीनीकरणाबाबत कुठलाही वाद नाही. जनता परिवारातील पक्षांनी समाजवादी पक्षाचे सायकल हे चिन्ह आणि लाल-हिरव्या रंगाचा ध्वज स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजदच्या एका वरिष्ठ नेत्याने नमूद केले. या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभेच्या निवडणुका होत असून जागावाटप कसे केले जाणार? यावर ते म्हणाले की, पूर्ण शक्तिनिशी लढायचे असल्यामुळेच आम्ही निश्चितच बिहार विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करू, त्यामुळेच आम्हाला विलीनीकरणाची प्रक्रिया लवकर पार पाडायची आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांना विलीनीकरणाचे सर्व अधिकार बहाल करण्यात आले आहे. त्यांनी एक- दोन दिवसांत आयएनएलडीचे अध्यक्ष अभय चौटाला व जेडीएसचे अध्यक्ष माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांची भेट घेतल्यानंतर विलीनीकरणाची घोषणा केली जाईल. (वृत्तसंस्था)
‘जनता परिवार’ एकाच चिन्हावर लढणार
By admin | Published: April 01, 2015 11:50 PM