ऑनलाइन लोकमत
गया, दि. ९ - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व नितीशकुमार यांचे जंगलराज पार्ट टू आले तर सर्व काही उध्वस्त होईल असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. दिल्लीतून विकासाची गंगा वाहत आहे, पण बिहारमधील अहंकारी सत्ताधा-यांनी ही गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिली नाही असा आरोपही मोदींनी केला आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गया येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतले. या सभेत मोदींनी लालूप्रसाद यादव नितीशकुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तुरुंगात गेल्यावर कोणताही व्यक्ती चांगल्या गोष्टी शिकून बाहेर येत नाही, जंगलराज पार्टवनच्या वेळी तुरुंगाचा अनुभव नव्हता, पण आता जंगलराज पार्ट टूमध्ये हा अनुभव जोडला गेला आहे अशा बोच-या शब्दात मोदींनी लालूप्रसाद यादव यांच्यावर टीकास्त्र सोडले. बिहारला जंगलराज, अहंकारी सरकारमधून मुक्त करण्याची गरज असून भाजपाच बिहारला आजारी राज्यातून बाहेर काढू शकेल असे त्यांनी सांगितले. राजद म्हणजे रोजाना जंगलराज का डर (रोज जंगलराजची भीती) व जदयू म्हणजे जनता का दमन व उत्पीडन (जनतेची दडपशाही व शोषण) असा अर्थ सांगत त्यांनी दोन्ही पक्षांवर सडकून टिका केली. बिहारपेक्षा छोट्या राज्यांमध्ये इंजिनिअरिंगच्या जास्त जागा आहेत, पण बिहारसारखी विशाल लोकसंख्या असलेल्या राज्यात इंजिनिअरिंगच्या फक्त २५ हजार जागा आहेत, यासाठी जबाबदार कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजकीय फायद्यासाठी बिहारमध्ये युती झाली खरी पण ही युती निवडणुकीनंतरही टीकेल का अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली.