वाराणसी : जन्मदिन हा केवळ आनंदोत्सव नाही. यानिमित्ताने जीवनाचा आढावा घेऊन आत्मचिंतन केले पाहिजे. जन्माला आल्यापासून आजपर्यंत काय केले व पुढे काय करायचे, हा विचार करण्यासाठी वाढदिवसाचे आयोजन झाले पाहिजे, असे प्रतिपादन श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
वाराणसी येथील जंगमवाडी मठात ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ७८ वा जन्मोत्सवानिमित्त ‘अष्टावरण विज्ञान’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील, प्रा. भीमाशंकर मोतीपवळे, प्रा. डॉ. कमलेश झा, सुभाष म्हमाणे उपस्थित होते.
डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी लिखित ‘अष्टावरण विज्ञान’ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन बीएचयूचे प्रा. डॉ. कमलेश झा आणि बसवराज पाटील यांच्या हस्ते झाले. सोलापूरचे कवी लिं. कुमार कोठावळे यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. हैदराबादचे वेदमूर्ती विश्वनाथ शास्त्री आणि मठातील वेदमूर्ती मल्लिकार्जुन शास्त्री यांनी वैदिक यज्ञाचे पौरोहित्य केले. पीठाचे व्यवस्थापक आर. के. स्वामी यांनी प्रास्ताविक, तर प्रा. रेवणसिद्ध शाबादे यांनी सूत्रसंचालन केले. नलिनी चिरमे, शिवानंद हिरेमठ, भक्त आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.