नवी दिल्ली: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे (Ex Prime Minister Shinzo Abe) यांचे शुक्रवारी निधन झाले. अबे यांच्यावर आज सकाळी गोळीबार झाला होता. शिंजो हे नारा शहरात भाषण देत असताना एका व्यक्तीने पाठीमागून त्यांच्यावर दोन गोळ्या घाडल्या. एक गोळी त्यांच्या गळ्याला आणि दुसरी छातीत लागली.
अचानक झालेल्या हल्ल्यानंतर शिंजो अबे जमिनीवर कोसळले. यादरम्यान त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्या हल्लेखोराला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेमुळे जापानसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनेक देश अबे यांच्या मृत्यूवर शोख व्यक्त करत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील अबे यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला.
काय म्हणाले नरेंद्र मोदी ?पंतप्रदान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शिंजो अबे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. त्यांनी ट्विट केले की, 'मी माझा सर्वात चांगला आणि प्रेमळ मित्र शिंजो अबे यांच्या निधनाने दुखी झालोय. ते एक महान जागतिक नेते आणि एक उल्लेखनीय प्रशासक होते. त्यांनी आपले जीवन जपान आणि जगाला चांगले बनवण्यासाठी समर्पित केले.'
1 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटामोदी पुढे म्हणाले की, 'अबे यांच्याशी गेल्या अनेक वर्षांपासून माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. गुजरातचा मुख्यमंत्री असताना माझी त्यांच्याशी ओळख झाली होती आणि मी पंतप्रधान झाल्यानंतरही आमची मैत्री कायम राहिली. अर्थव्यवस्थेबद्दल आणि जागतिक घडामोडींबद्दल असणाऱ्या त्यांच्या ज्ञानाने माझ्यावर नेहमीच खोल छाप पाडली.
माझ्या नुकत्याच झालेल्या जपान भेटीत मला अबे यांना पुन्हा भेटण्याची आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. ही आमची शेवटची भेट असेल, याचा मी विचारही केला नव्हता. शिंजो यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी उद्या दि. 9 जुलै 2022 रोजी मी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करतो.'