मुंबई: जपानचापासपोर्ट सर्वात शक्तीशाली असल्याचं हेन्ले पासपोर्ट इंडेक्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून समोर आलं आहे. या अहवालानुसार, जपानच्या नागरिकांनी 190 देशांमध्ये विसाशिवाय प्रवेश मिळतो. या यादीत भारताचा 81 वा क्रमांक लागतो. एखाद्या देशाच्या पासपोर्टवर किती देशांमध्ये विसाशिवाय प्रवेश मिळतो, यावर त्या देशाच्या पासपोर्टचं सामर्थ्य ठरतं. भारतीय पासपोर्टवर 75 देशांमध्ये विसाशिवाय प्रवेश मिळतो. जपानचे नागरिक त्यांच्या पासपोर्टवर 190 देशांमध्ये थेट जाऊ शकतात. यासाठी त्यांना त्या देशात जाण्याआधी विसा काढावा लागत नाही. त्या देशात पोहोचल्यावर त्यांना लगेच विसा (विसा ऑन अरायवल) मिळतो. या यादीत सिंगापूरचा दुसरा क्रमांक लागतो. सिंगापूरच्या पासपोर्टवर थेट 189 देशांमध्ये प्रवेश मिळतो. या यादीत जर्मनी, फ्रान्स, दक्षिण कोरिया हे देश संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. या तिन्ही देशांचा पासपोर्ट असल्यास 188 देशांमध्ये थेट प्रवेश मिळतो. सामर्थ्यशाली पासपोर्टच्या यादीत डेन्मार्क, फिनलँड, इटली, स्वीडन आणि स्पेन हे पाच देश संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. या देशांचा पासपोर्ट जगातील 187 देश विसा ऑन अरायवलची सुविधा देतात. यानंतर नॉर्वे, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रिया, लक्झेमबर्ग, नेदरलँड्स, पोर्तुगाल आणि अमेरिका संयुक्तपणे पाचव्या स्थानी आहेत. या देशांच्या पासपोर्टवर 186 देशांमध्ये थेट प्रवेश मिळतो. या यादीत इराक आणि अफगाणिस्तान तळाला आहेत. हे दोन्ही देश 106 व्या स्थानी असून त्यांच्या पासपोर्टवर केवळ 30 देशांमध्ये विसा ऑन अरायवलची सुविधा मिळू शकते.
जपानचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली; जाणून घ्या भारत नेमका कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 1:43 PM