ऑनलाइन लोकमत
अहमदबाद, दि. २६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जसोदाबेन या त्यांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या सुरक्षा रक्षकांच्या 'चिरीमिरी'मुळे त्रस्त झाल्याचे समजते. या कारणावरुनच त्यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा तपशील मागवल्याची चर्चा आहे.
जसोदाबेन यांनी सुरक्षा व्यवस्थेचा तपशील मागणारा अर्ज माहिती अधिकार कायद्यान्वये (आरटीआय) केला आहे. अहमदाबादमधील स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार जसोदाबेन यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचा-यांना आदरातिथ्य हवा असतो. हे कर्मचारी वारंवार चहा तसेच खाण्याचा खर्च द्यायला सांगतात असे जसोदाबेन यांनी संबंधीत वृत्तपत्राला सांगितले. या कर्मचा-यांना भत्ता कमी मिळत असल्याने ते जवान असे करत असावेत असे त्यांनी नमूद केले आहे. गेल्या आठवड्यात जसोदाबेन या मुंबईतील मीरा रोड येथे राहणा-या भावाच्या घरी मुक्कामाला आल्या होत्या. जसोदाबेन यांच्यासोबत नऊ सुरक्षा रक्षक आले होते. जसोदाबेन यांचे बंधू अशोक मोदी यांनी या सर्व सुरक्षा रक्षकांना राहण्यासाठी स्वतःची सोयू करुन घ्या अशी विनंती केली होती. मात्र जसोदाबेन यांना सोडून जाता येत नसल्याचे सांगत या सुरक्षा रक्षकांनी इमारतीच्या तळमजल्यावरच स्वतःच्या राहण्याची सोय करुन घेतली. यानंतर हे सर्व सुरक्षा रक्षक दररोज जसोदाबेन यांच्याकडे चहा, नाश्ता आणि जेवणासाठी खर्च मागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे ऐवढ्या कर्मचा-यांचा आर्थिक बोजा उचलणे जसोदाबेन यांना शक्य नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. माहितीच्या अधिकारातून या सुरक्षा रक्षकांचा वेतनाचा मुद्दाही उघड होईल अशी आशा व्यक्त होत आहे.