जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला धक्का बसला आहे. अटलबिहारी वायपेयी सरकारमध्ये केंद्रीयमंत्री राहिलेले आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र आमदार मानवेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. मानवेंद्र सिंह यांनी बाडमेरमध्ये झालेल्या स्वाभिमान रॅलीत भाजपाविरोधात बंड पुकारला. 'कमल का फूल हमारी भूल थी' असा टोला भाजपाला लगावत त्यांनी भाजपामधून बाहेर पडण्याचा आपला निर्णय जाहीर केला.
2014 मधील लोकसभा निवडणुकीत बाडमेर चर्चेचा विषय ठरला होता. तसेच, 2018 मध्ये सुद्धा सर्वांचे लक्ष बाडमेरकडे असणार आहे, असे यावेळी मानवेंद्र सिंह रॅलीत म्हणाले. बाडमेरमध्ये याआधी गौरव आणि संकल्प रॅली झाली आहे. मात्र आज स्वाभिमान रॅली आहे. या रॅलीच्या माध्यमातून स्वाभिमानासाठी लोक एकत्र आले आहेत. या लढाईत 36 समाजातील लोक आमच्यासोबत आहेत, असा दावा मानवेंद्र सिंह यांनी केला.
जसवंत सिंह यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाडमेर मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आले होते. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी जसवंत सिंह यांचा पत्ता कट केल्याची चर्चा त्यावेळी राजस्थानच्या राजकारणात होती. तसेच, यामुळे जसवंत सिंह कुटुंबीय व वसुंधरा यांच्यात कटुता निर्माण झाली होती.