चंदीगड : आरक्षणाच्या मागणीसाठी हरियाणात सुरू असलेल्या जाट समाजाच्या आंदोलनाने शुक्रवारी हिंसक वळण घेतले असून, आंदोलकांनी राज्याचे अर्थमंत्री कॅप्टन अभिमन्यू यांच्या घराला आग लावल्याचे वृत्त आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर २५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. हरियाणातील २१ पैकी १९ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन पसरले असून त्यामुळे राज्यातील बससेवा आणि रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. आज रेल्वेच्या ५५0हून अधिक गाड्यांवर परिणाम झाला. आंदोलनाचे रुद्र स्वरूप पाहून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जाट समाजाला आरक्षण देण्यासाठी विधानसभेत विधेयक आणले जाईल, अशी घोषणा संध्याकाळी केली. या आरक्षणाला विरोधी पक्षांनीही सहमती दर्शवली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही जाट संघर्ष समितीने रात्रीपर्यंत आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली नव्हती.नऊ जिल्ह्यांत लष्कर तैनातहरियाणाच्या नऊ जिल्ह्यांत शुक्रवारी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे तर रोहतक आणि भिवानी येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रोहतक येथे लष्कराला पाचारण करण्यात आले असून, शूट अॅट साईटचे आदेश देण्यात आले आहेत. जिंद, झज्जर, भिवानी, हिसार, कैथल, सोनिपत, पानिपत व करनाल या जिल्ह्यांमध्ये लवकरच लष्कर रवाना केले जाणार आहे.सर्वपक्षीय बैठकहे आंदोलन आणखी चिघळू नये यासाठी प्रशासनाने इंटरनेट आणि एसएमएस सेवा निलंबित केली आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे जाट नसल्याने या आरक्षणाच्या मागणीला विरोध करीत असल्याची टीका जाट नेत्यांनी केली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.रेल्वेसेवेला फटकाकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनामुळे राज्य सरकारने २१ फेब्रुवारीचे संत रविदास जयंतीचे सारे कार्यक्रम रद्द केले आहेत. आंदोलन मागे न घेतल्यास मुंबई व महाराष्ट्राकडून येणाऱ्या व जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होईल.> आंदोलन मागे घेण्यास जाट नेत्यांचा नकारजाट समाजाच्या लोकांनी ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनात १५ कार व ३० बसेसची तोडफोड केली; तसेच पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयावरही दगडफेक केली. तिथेही पोलिसांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. राज्यातून जाणारे ३ राष्ट्रीय महामार्ग आणि सर्व राज्य महामार्ग बंद झालेले आहेत. आंदोलकांनी ठिकठिकाणी रेल्वेगाड्याही अडवून ठेवल्या तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळांवरच ठाण मांडले आणि तिथे अडथळे निर्माण केले. त्यामुळे दिल्ली-अमृतसर मार्ग बंद झाला आहे. सोनीपत-पानीपत आणि अंबाला-दिल्ली रेल्वेसेवाही सध्या बंद आहे.आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यास जाट नेत्यांनी नकार दिला आहे. जाटांना ओबीसी कोट्यात आरक्षण देणारा कायदा संमत होईपर्यंत आरक्षण आंदोलन सुरूच राहील, असे जाट नेत्यांनी जाहीर केले.
जाट आंदोलन पेटले!
By admin | Published: February 20, 2016 3:32 AM