नवी दिल्ली : गेले ५० दिवस धरणे आंदोलन करणाऱ्या जाट आंदोलकांच्या सातपैकी चार मागण्या मान्य झाल्याने, उद्या सोमवारी संसदेला घेराव घालण्यासह भावी आंदोलन माग घेतल्याचे अ.भा.जाट आरक्षण संघर्ष समितीने रविवारी सायंकाळी जाहीर केले.आंदोलन पार्श्वभूमिवर दिल्लीत आणि हरियाणात कडेकोट बंदोबस्त केला जात असतानाच, चर्चा यशस्वी होऊन आंदोलन मागे घेतले गेले. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि बिरेंद्र सिंह आणि पी. पी. चौधरी या केंद्रीय जाट मंत्र्यांसोबत जाटांच्या नेत्यांची तब्बल चार तास बैठक झाली. केंद्र आणि राज्य सरकार दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय होताच, लवकरच राखीव जागा देण्याची प्रक्रिया सुरू करील, असे खट्टर यांनी सांगितले. राज्यात शांतता आणि सलोखा राखण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सरकारने आमच्या चार मागण्या मान्य केल्या आहेत, त्यामुळे जाट आता दिल्लीला जाणार नाहीत, आम्ही आमचे आंदोलन मागे घेतले आहे, अ. भा. जाट आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष यशपाल मलिक यांनी जाहीर केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जाट आंदोलकांचा ‘संसद घेराव’ मागे
By admin | Published: March 20, 2017 4:03 AM