ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. २१ - जाट समाजाला ओबीसी आरक्षण देणारे विधेयक हरयाणा विधानसभेत सादर केले जाईस असे भाजप नेते अनिल जैन यांनी रविवारी सांगितले. जाट नेत्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर जैन यांनी ही माहिती दिली.
जाट समाजाच्या मागण्यांचा विचार करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल असेही जैन यांनी सांगितले. सरकारने ही आश्वासने देऊन एकप्रकारे आरक्षणासाठी हिंसाचार करणा-या आंदोलकांपुढे नमते घेतले आहे
जाट नेता जयपालसिंह सांगवान यांनी आंदोलन संपवण्याचे आवाहन केले आहे, सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा केला आहे.
ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी जाट समाजाकडून हरयाणामध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. शनिवारप्रमाणे रविवारीही अनेक भागांमध्ये हिंसाचार, जाळपोळ करण्यात आली. लष्कर, पोलिसांच्या तुकडया तैनात करण्यात आल्यानंतरही हरियाणामधील हिंसाचार नियंत्रणात आलेला नाही.
भिवानी आणि सोनीपतमध्ये आंदोलकांनी दोन पोलिस चौक्या, दुकाने आणि एटीएम मशीन जाळल्या. लष्कराने येथे ध्वजसंचलन केले असून, सर्वाधिक वाईट परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये हवाई टेहळणीव्दारे लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंतच्या हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू झाला असून, १५० जण जखमी झाले आहेत. जाट आरक्षण आंदोलनामुळे रविवारीही हरयाणात तणाव कायम असून, राज्याच्या अनेक भागात हिंसाचार सुरु आहे. बसई धानकोट रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटरला जमावाने आग लावली. सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनकर्त्यांनी दिल्ली-चंदीगड महामार्गावरील वाहतुकीसाठी बंद केला आहे.
जिंदमध्ये आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल पंपाची नासधूस केली. १५४ एफआयआर दाखल झाले आहेत. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही.
रोहतक, जिंद, भिवानी, झांज्जर, सोनीपत, हिस्सार या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सर्वाधिक खराब आहे. आंदोलनकर्त्यांनी शनिवारी रात्री बँकेच्या एटीएम मशीनला आग लावली. भिवानीमधील लोहारुमध्ये कोऑपरेटीव्ह बँकेची कागदपत्रे जाळली. मोठया प्रमाणावर जवानांची तैनाती झाल्यानंतरही हिंसाचार सुरु आहे.