ऑनलाइन लोकमत
भारतपूर (राजस्थान), दि. 23 - जाट आरक्षणाची मागणी करणा-या हिंसक निदर्शकांनी मंगळवारी रेल्वे स्थानकामध्ये तोडफोड केली तसेच मालगाडीच्या एका इंजिनाला आग लावली. सलग दुस-या दिवशी जाट आंदोलनाने समाज जीवन अस्थिर केले आहे. पोलीसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला तसेच अश्रुधुराचा वापर केला.
उच्छैन येथे राष्ट्रीय महामार्ग अकरावर निदर्शक मोठ्या प्रमाणावर गोळा झाले होते, तिथेही पोलीसांनी हवेत गोळीबार केला. हेलक स्थानकात उभ्या असलेल्या मालगाडीच्या इंजिनाला निदर्शकांनी आग लावली तर पारपेरा या स्थानकाची नासधूस केल्याचे भारतपूरचे पोलीस महासंचालक अलोक वशिष्ठ यांनी सांगितले.
जिल्ह्यात जिथे जिथे परिस्थिती चिघळली तिथे तिथे पोलीसांची कुमक धाडण्यात आली असून निदर्शकांना पांगवण्याचे काम सुरू असल्याचे वशिष्ठ म्हणाले.
आता, भारतपूरमधली स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलीसांनी केला आहे. निदर्शकांनी केवळ रेल्वे स्थानकांची नासधूस केली नाही तर तिकिट काउंटरवरून पाच हजार रुपयांची रक्कमही लंपास केल्याचे पोलीसांनी सांगितले.
हरयाणामधल्या जाटांच्या आंदोलनाला राजस्थानमधल्या जाट समुदायाने पाठिंबा दिल्यामुळे कालपासून राजस्थानमधले काही जिल्हे अशांत झाले आहेत. अशा भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.