कोण, कधी, कोणाच्या, कसं प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. अशीच एक घटना घडली आहे. वाराणसीतील एक तरुण एका इटालियन तरुणीच्या प्रेमात पडला आणि त्यांनी लग्नही केलं. जॉर्जियामध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र हा तरुण वाराणसीचा रहिवासी आहे. त्यामुळेच लग्नानंतर तरुण पत्नीला भारतात घेऊन आला आहे. जौनपूरच्या त्रिलोचन महादेव मंदिरात दोघांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले आणि पूजा केली. यादरम्यान दोघांनीही त्यांचे फोटो काढले जे पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता हे कपल सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.
त्रिलोचन महादेव मंदिरातच या जोडप्याचा विवाह झाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. पण असं काही नाही. मंदिराचे मुख्य पुजारी सोनू गिरी यांनी सांगितले की, नोंदणीशिवाय येथे कोणतंही लग्न होत नाही. मंदिरात दररोज हजारो भाविक हवनपूजनासाठी येतात. येथे होणाऱ्या विवाहांची नोंदणी केली जाते. अखिलेश विश्वकर्मा आणि इटलीच्या तानियाच्या लग्नाबाबत सांगायचे तर या दोघांनीही परदेशात लग्न केलं आहे. दोघेही येथे दर्शन आणि पूजेसाठी आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी जिल्ह्यातील कारखियांव गावात राहणारा अखिलेश विश्वकर्मा हा हॉटेल मॅनेजमेंट करून 2016 मध्ये कतारला गेला होता. अखिलेश तेथे कतार एअरवेजमध्ये केबिन क्रू म्हणून काम करू लागला. काही दिवसांनी अखिलेश इटलीतील तानिया या तरुणीच्या प्रेमात पडला आणि दोघांमधील जवळीक वाढू लागली. जवळीक इतकी वाढली की दोघांनी जॉर्जियामध्ये लग्न केलं.
इटालियन सून मिळाल्याने तरुणाचे कुटुंब आणि गावातील लोक आनंदी दिसत आहेत. अखिलेशची पत्नी तानिया ही परदेशातील एका शाळेत इंग्रजीची शिक्षिका असल्याची माहिती समोर आली आहे. अखिलेश याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघेही भेटले होते. पहिल्याच भेटीत तानिया आणि अखिलेश एकमेकांना आवडू लागले. दोघांनी जॉर्जियामध्ये मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. लग्नानंतर तानियाने अखिलेशकडे काशीला जाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर अखिलेशने इटालियन पत्नी तानियाचा व्हिसा घेतला आणि तिला भारतात आणलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.