कपूरथळा (पंजाब) : श्री गुरू नानक देव यांच्या ५५० व्या प्रकाशपर्व उत्सवानिमित्त येथील गुरुद्वारा बेर साहिबमध्ये माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी दर्शन घेऊन मल्टी मीडिया प्रदर्शनाचे उद््घाटन केले. लंगरमध्ये जाऊन जावडेकर यांनी भाविकांना लंगरची सेवा दिली.जावडेकर म्हणाले, ‘दुनिया को किरत करो-नाम जपो, वंड छको को जीवन मे ढालना चाहिए.’ यानंतर त्यांनी गुरू नानक देव यांच्या जीवनावर आधारीत एका मल्टी मिडिया प्रदर्शनाचे उद््घाटन केले. हे प्रदर्शन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ब्युरो आॅफ आऊटरीच अँड कम्युनिकेशनने (बीओसी) लावले आहे. यावेळी अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल आणि बीओसीचे महासंचालक सत्येंद्र प्रकाश उपस्थित होते. १२ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन चालेल.
जावडेकर म्हणाले की, प्रदर्शन श्री गुरू नानक देव जी यांचा संदेश आणि शिकवणुकीचा प्रचार करीत आहे. भाविकांची गर्दी पाहता प्रदर्शनाचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. श्री पाटणा साहिब, श्री नांदेड साहिब, विशाखापट्टणम, कुल्लू, कश्मीर आणि कश्मीरच्या काही भागांसह संपूर्ण देशात अनेक ठिकाणी एकाच वेळी हे प्रदर्शन होत आहे. जावडेकर यांनी सांगितले की, बाबा नानक यांचा संदेश एक ओंकार सार्वभौमिक आहे. हरसिमरत कौर यांनी प्रदर्शनाची प्रशंसा करून म्हटले की, अशा प्रदर्शनातून श्री गुरू नानक देव जी यांच्या शिकवणुकीचा प्रसार होतो. शिख समाजाचा सन्मान वाढवण्यासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार कौर यांनी मानले.प्रदर्शनात त्यांनी फोटोग्राफी पॉर्इंट, श्री गुरू नानक देव जी यांच्या रचनांवर आधारीत डिजिटल प्रोग्रॅम पाहिला आणि पूर्णपणे थ्री डी आणि फाइव्ह डी तंत्रज्ञानावर आधारीत या डिजिटल प्रदर्शनाच्या एकेका पॅनेलवर जाऊन अतिशय बारकाईने अवलोकन केले. त्या आधी पाकिस्तानने व्हिसा देण्यावरून हो-ना केले त्यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. त्या एवढ्याच म्हणाल्या की, ते पाहणे सुरक्षा यंत्रणांचे काम आहे.