ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 3 - स्थानिक लष्करी प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने काश्मीरमध्ये जवानाला आईचा मृतदेह खांद्यावर उचलून बर्फामधून वाट काढावी लागली. मोहम्मद अब्बास या जवानाच्या आईचे 28 जानेवारीला ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुपवाडा जिल्ह्यातील दुर्गम कारनाह गावात राहणा-या अब्बासला मूळगावी आईचा दफनविधी करायचा होता.
पण बर्फवृष्टीमुळे मूळगावी जाण्यासाठी अब्बासला आठवडाभर थांबावे लागणार होते. गावापर्यंत जाणा-या रस्त्यावर पाच ते सहा इंच बर्फ साचला होता. त्याने आपल्या वरिष्ठांकडे हॅलिकॉप्टर उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. पण खराब हवामानामुळे त्याची विनंती फेटाळण्यात आली. रस्ते मार्गाने तर, शक्यच नव्हते.
तीन दिवस थांबल्यानंतर अब्बासने नातेवाईकांबरोबर चर्चा करुन पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बांबूच्या सहाय्याने तयार केलेल्या स्ट्रेचरवर आईचा मृतदेह ठेवला व खाद्यांवर स्ट्रेचर उचलून पायी प्रवास सुरु केला. आईचा व्यवस्थित दफनविधी व्हावा यासाठी त्यांनी जीवाची जोखीम पत्करली. संपूर्ण बर्फाच्छीत रस्त्यावरुन 50 किमी पेक्षा अधिकचे अंतर कापण्यासाठी त्यांना 10 तास लागले. गुरुवारी संध्याकाळी गावी पोहोचल्यानंतर त्याने आईचा दफनविधी केला.