नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सोमवारी त्यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दिल्लीच्या येथील शांतीवनात नेहरू यांच्या स्मारकावर जाऊन मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी फुले अर्पण केली. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नेतृत्वाखाली संसद सदस्यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधील नेहरूंच्या तसबिरीला फुले अर्पण केली. ‘पंडित नेहरू यांना जयंती दिनाबद्दल आदर’ असे मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनीही शांतीवनात जाऊन नेहरूंना पुष्पांजली अर्पण केली. नेत्यांनी राष्ट्रध्वजाच्या रंगातील फुगे आकाशात सोडले, शाळकरी मुलांनी देशभक्तीची गाणी म्हटली. नेहरू यांच्याबद्दल माहिती सांगणारी हिंदी व इंग्रजी भाषेतील लोकसभा सचिवालयाने प्रकाशित केलेली पुस्तिका या वेळी देण्यात आली.
जवाहरलाल नेहरूंना देशाची आदरांजली
By admin | Published: November 15, 2016 2:10 AM