नवी दिल्ली - भाजप नेत्याने (BJP) गांधी टोपीवरून एक वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळे राजकारण तापलं असून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भाजपा नेत्याने "'गांधी टोपी' पंडित जवाहरलाल नेहरू परिधान करायचे, महात्मा गांधी नाही" अशा आशयाचं विधान केलं आहे. यावर काँग्रेस पक्षाने आता आपला आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे देशात आता गांधी टोपीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसने देखील भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, ते आता स्वातंत्र्य सेनानी आणि भारताच्या पहिल्या पंतप्रधानांवर बोट दाखवत आहेत असं म्हटलं आहे.
भाजपाच्या गुजरात युनिटचे नवनियुक्त सरचिटणीस रत्नाकर यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी कधीही गांधी टोपी घातली नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) मात्र ही टोपी परिधान करायचे असा दावा केला आहे. रत्नाकर यांच्या विधानानंतर त्यांच्यावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. तर गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी रत्नाकर यांची बाजू घेतली आहे. संबंधित टोपी ही 'गांधी टोपी' म्हणून ओळखली जात असली तरी राष्ट्रपितांनी ती टोपी कधीही घातली नाही. ही टोपी घातलेली देखील त्यांना कोणीही पाहिलं नाही असं म्हणत रत्नाकर यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.
"गांधीजींनी 'गांधी टोपी' घातलेला एकही फोटो पाहिला नाही"
नितीन पटेल यांनी गांधीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना याबाबत विधान केलं आहे. "गांधीजींनी 'गांधी टोपी' घातलेला एकही फोटो पाहिला नाही. किंवा कोणालाही तसा फोटो सापडला नाही. मी सुद्धा अशाप्रकारचा फोटो कधीही पाहिला नाही. त्यामुळे रत्नाकर जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे. रत्नाकर यांनी रविवारी ट्वीट केलं होतं यामध्ये 'गांधी टोपी पहिल्यांदा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी घातली होती आणि स्वतः महात्मा गांधींनी ही टोपी कधीच परिधान केली नाही. मग या टोपीला 'गांधी टोपी' का म्हणतात?' असं म्हटलं होतं.
काँग्रेसचा जोरदार निशाणा
भाजपा नेत्याच्या या विधानावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या गुजरात युनिटने ज्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांची बाजू घेतली ते लोकं आता स्वातंत्र्य सैनिक आणि भारताचे पहिले पंतप्रधान यांच्याकडे बोट दाखवत आहेत असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भाजपाने यावरून राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. 'राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू (कोकीळ)' अशी बोचरी टीका केली आहे. तसेच कोकीळ हा पक्ष कधीच आपलं घरटं बांधत नाही. तो कष्ट घेत नाही. हा दुसऱ्या पक्षांच्या घरट्यातून आनंद घेतो. राहुल गांधी सध्या असंच करत आहेत', अशा शब्दांत टीकास्त्र सोडलं आहे.
"राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील 'राजकीय कुक्कू'"; भाजपाची बोचरी टीका
भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावरून राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी जमिनीवरून राजकारण करत नाही. पण ट्विटरवर सक्रिय असल्याने ते भ्रमाचं राजकारण करत आहेत. त्यांनी ट्वीट करून मुजफ्फरनगरमधील शेतकरी आंदोलनाचा खोटा फोटो दाखवला, असं संबित पात्रा म्हणाले. "राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू आहेत. जो दुसऱ्यांच्या घरट्यावर अवलंबून असतो. असंच राहुल गांधींचही आहे. आपल्या पक्षाला पुढे न नेणं, अध्यक्षाविना आपला पक्ष चालवणं, कठोर परिश्रम न करणं आणि दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा प्रयत्न करणं ही राहुल गांधींना वाईट सवय जडली आहे" असं म्हटलं आहे.