ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ - उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पाकचे धाबे दणाणले. मात्र त्यानंतर अवघ्या १ दिवसानंतर भारताचा एक जवान नजरचुकीने सीमारेषा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्याचे समोर आले. तब्बल चार महिन्यांनी पाकच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेला ३७ राष्ट्रीय रायफल्सचा जवान, चंदू चव्हाण याची सध्या कसून चौकशी सुरू असून त्या दरम्यान पाकिस्तानने त्याच्यावर केलेल्या अन्यायाची कहाणी ऐकून कोणाचाही थरकाप उडेल.
सीमा ओलांडून हद्दीत प्रवेश का केला, हे जाणून घेण्यासाठी पाकिस्तानने चंदू यांचा अनन्वित शारिरीक छळ केला. त्याला बेदम मारहाण तर करण्यात यायचीच पण दोन-तीन दिवस उपाशी ठेवले जायचे, वारंवार विशिष्ट स्वरूपाचे (ड्रग्ज?) इंजेक्शन देण्यात यायचे, अशी माहिती चंदू यांचा भाऊ भूषण यांनी दिली.
२१ जानेवारी रोजी पाकिस्तानने चंदूची सुटका केली. भारताच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पाकिस्तानने अकेर चंदूला सोडले. मात्र त्यापूर्वी त्याच्याकडून माहिती काढून घेण्यासाठी त्याचा शारिरीक छळ करण्यात आला, त्याला झोपूही दिले जात नसे.
चंदू चव्हाणची सध्या भारतीय लष्कर व गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. वरिष्ठांशी झालेल्या मतभेदांतून रागाच्या भरात चंदूने सीमा ओलांडल्याचे सांगितले जात असून त्या अनुषंगाने त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्यामध्ये दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
चंदू यांच्यावर झालेल्या अत्याचाराची त्यांचा भाऊ भूषण यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘अटक केल्यापासून चंदूला अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. आपण पाकिस्तानी हद्दीत प्रवेश का केला, ही माहिती काढण्याचा बराच छळ करण्यात आला. हाताची बोटे इतक्या वेळा वाकविली की, त्याच्या जखमा आजपर्यंत भरून निघालेल्या नाहीत. बोलत करण्यासाठी त्याला दोन-तीन दिवस अन्नच दिले जायचे नाही. त्यामुळे प्रचंड थकवा यायचा. त्या स्थितीत हातावर वारंवार कसलेकरी इंजेक्शन टोचले जात होते, मात्र त्यामागचं कारण कळलं नाही. पाकिस्तानातल बहुतांश काळ अंधाऱ्या खोलीत काढावा लागला. कधी तरी कोठडीतून बाहेर काढले जात असे, पण त्याच वेळेसे चेहे-यावर कपडा बांधण्यात येत असल्याने आपण नेमके कुढे आहेत, हे समजत नसे. 21 जानेवारीला त्याने पहिल्यांदा वाघा बॉर्डरवर उजेड पाहिला' अशी माहिती भूषणनं दिली.
कोण आहेत चंदू चव्हाण?
चंदू चव्हाण मूळचा धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचा. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहे. तो जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. 29 सप्टेबरला चंदूने चुकून सीमा ओलांडली होती. त्यानंतर तो पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागला. या बातमीनं धक्का बसून चंदूच्या आजीचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. अखेर संरक्षण खात्यानं केलेल्या योग्य वाटाघाटी आणि शिष्टाईमुळे चंदूला परत आणण्यात यश आलं.