जम्मू - काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय रंग देण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पाकिस्ताने नियंत्रण रेषेवरील कुरबुरी वाढवण्यात सुरुवात केली आहे. दरम्यान, आज जम्मूमधील कृष्णाघाटी परिसरात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले आहे. दरम्यान, भारतीय लष्करानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
भारत सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने आंततराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांमध्ये नाचक्की झाल्याने आता पाकिस्तानने आपला मोर्चा काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याकडे वळवला आहे. दरम्यान, आज सकाळी नियंत्रण रेषेजवळी कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानने मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. शहीद जवानाचे नाव नाईक रवी राजन कुमार सिंह असल्याचे समोर आले आहे. तसेच पाकिस्तानच्या या गोळीबारामुळे चार जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या आगळीकीमुळे नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने स्थानिक रहिवाशांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, पाकिस्तानकडून होत असलेल्या आगळीकीला भारतीय सुरक्षा दलांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.