श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या सोपोर गावात बुधवारी मशिदीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात जवान शहीद झाला, तर एक नागरिक मरण पावला. सकाळी ८ वाजता झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले. ठार झालेल्या नागरिकाच्या तीन वर्षांच्या नातवाला सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी गोळ्यांच्या वर्षावातून सुखरूप बाहेर काढले.
सीआरपीएफचे पथक नेहमीच्या गस्ती कामावर असताना त्याच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला व ते तेथून पळून गेले, असे अधिकाºयाने सांगितले. मशिदीमध्ये किती दहशतवादी होते, हे समजले नाही. बशीर खान (६०) हे त्यांच्या नातवाला घेऊन कारने निघाले होते. हल्ला होताच ते कार सोडून नातवाला घेऊन सुरक्षित ठिकाणी जात असताना ठार झाले. नातू आजोबांच्या मृतदेहापाशी रडत असताना पाहून जवानांपैकी काही जण त्याला वाचविण्यासाठी धावले व इतरांनी त्यांना गोळीबारापासून संरक्षण दिले. सीआरपीएफच्या सूत्रांनुसार शहीद झालेल्या एका जवानाचे नाव कॉस्टेबल दीपचंद वर्मा आहे तर जखमी झालेल्यांत कॉन्स्टेबल भोया राजेश, कॉन्स्टेबल दीपक पाटील आणि निलेश चवडे यांचा समावेश आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.