श्रीनगर- भाजपाचे खासदार नेपाल सिंह यांनी देशासाठी सीमेवर बलिदान देणाऱ्या जवानांचा अपमान करणार विधान केलं आहे.‘सैन्यात जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाही’ असं संतापजनक वक्तव्य नेपाल सिंह यांनी केलं आहे. नेपाल सिंह यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका होत असून त्यांनी जवांनाची माफी मागावी अशी मागणी केली गेली. उत्तर प्रदेशच्या रामपूर मतदारसंघाचे नेपाल सिंह खासदार आहेत. नेपाल सिंह यांच्या या वक्तव्यावर टीका होताच त्यांनी सारवासारव केली आहे. माझ्या विधानाचा तो अर्थ नव्हता, असं त्यांनी म्हंटलं. जवानांचा अपमान होईल, असं कुठलंही विधान मी केलेलं नाही, असंही त्यांनी म्हंटलं.
जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे सीआरपीएफच्या 185 बटालियनच्या मुख्यालयावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेपाल सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला.यावेळी नेपाल सिंह यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. सैन्याचे जवान असल्याने त्यांचा जीव जाणारच. असा कोणता देश आहे की जिथे सैन्यातील जवान मरत नाही. आपल्या विधानाचे समर्थन करताना नेपाल सिंह यांनी गल्लीतील भांडणाचं उदाहरण दिलं. गावात जेव्हा भांडणं होतात, त्यावेळीही मारामारीत किमान एक तरी व्यक्ती जखमी होतेच, असंही ते म्हणाले.
यानंतर नेपाल सिंह यांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारला. मला तुम्ही असे डिव्हाईस दाखवा की ज्यामुळे माणूस मरणार नाही. बंदुकीची गोळीही परिणाम करु शकणार नाही, अशी वस्तू दाखवा, असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. नेपालसिंह यांनी जवानांविषयी केलेल्या या विधानामुळे सगळीकडूनच नाराजी व्यक्त केली जाते आहे.
दरम्यान, नेपाल सिंह यांच्या या वक्तव्यावर टीका होताच नेपाल सिंह यांनी सारवासारव केली आहे. माझ्या विधानाचा तो अर्थ नव्हता, असं त्यांनी म्हंटलं. जवानांचा अपमान होईल, असं कुठलंही विधान मी केलेलं नाही. मी केलेल्या विधानाचं मला दुःख आहे त्यासाठी मी माफी मागतो पण जवानांचा अपमान होईल, असं मी काहीही बोललो नाही. वैज्ञानिक डिव्हाइस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत ज्यामुळे गोळी येऊन पण लागणार नाही, सैनिकांचं संरक्षण होईल, असं मी म्हंटलं होतं अशी सारवासारव भाजपा खासदार नेपाल सिंह यांनी केली.