Encounter Video : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले. १४ सप्टेंबर रोजी शोध मोहीम हाती घेत केलेल्या कारवाईत लष्कराला मोठे यश मिळाले. दहशतवादी आणि लष्कराचे जवान यांच्यात झालेल्या चकमकीचा ड्रोनमध्ये कैद झालेला एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एक दहशतवादी रायफल घेत असतानाच जवानांनी टिपल्याचे दिसत आहे.
दहशतवादी-जवानांमध्ये चकमक; व्हिडीओमध्ये काय?
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये चकमक सुरू झाल्यानंतर दहशतवादी पळताना दिसत आहे. ज्या ठिकाणी दहशतवादी लपून बसले होते, त्याला जवानांनी वेढा दिला. त्यानंतर एक दहशतवादी पळून जाण्यासाठी बाहेर आला. त्याचवेळी जवानांनी त्याला टिपले.
गोळ्या लागून दहशतवादी जखमी झाला आणि खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याच्या हातातील रायफलही पडली. सरपट जाऊन त्याने रायफल उचलली त्याच वेळी जवानांनी गोळ्या झाडल्या आणि त्याचा खात्मा केला.
माहिती मिळताच शोध मोहीम आणि तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात चक टपर क्रिरी परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर 13-14 सप्टेंबरच्या रात्री लष्कराने त्या ठिकाणाला वेढा दिला आणि शोध मोहीम सुरू केली.
जवानांनी वेढा दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली. रात्रभर चाललेल्या या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.
ठार झालेले तिन्ही दहशतवादी एका शाळेजवळच्या इमारतीत लपलेले होते. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत असताना लष्कराने दहशतवाद्यांचा डाव उधळून लावला.